https://www.dompsc.com



मन की बात मध्ये मोदिनी केला हा उलघडा

मन की बात मध्ये मोदिनी केला हा उलघडा

➤माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ च्या प्रारंभी आज, तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देतोय. ही बातमी जाणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणार आहे. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1913 च्या आसपास वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती. मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सर्वतोपरी मदत केली, त्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी अगदी सहृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. माता अन्नपूर्णा आणि काशी यांच्यामध्ये विशेष संबंध आहे. आता मातेची प्राचीन मूर्ती मायदेशी परत येतेय, ही एक सुखद गोष्ट आहे. माता अन्नपूर्णेच्या मूर्तीप्रमाणेच आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या आहेत. या टोळ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा वस्तू खूप मोठ्या किंमतीला विकतात. आता, अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्यात येत आहेत. या टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवले आहेत. अशा प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात गेलेल्या अनेक मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्यामध्ये यश मिळालंय. माता अन्नपूर्णेची मूर्ती परत येण्यासंबंधी एक योगायोगही आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा सप्ताह साजरा केला. जागतिक वारसा सप्ताह, संस्कृतीप्रेमींसाठी, प्राचीन काळामध्ये जाण्याची, इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती घेण्याच्या दृष्टीनं एक खूप चांगली संधी असते. कोरोना काळ असतानाही यावेळी अगदी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या लोकांनी वारसा सप्ताह साजरा करताना आपण सर्वांनी पाहिलं. संकटाच्या काळात संस्कृती खूप कामी येत असते. संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावत असते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संस्कृती आपल्याला भावनिक ‘रिचार्ज’ करण्याचं काम करते. आज देशामध्ये अनेक वस्तू संग्रहालयं आणि ग्रंथालयं आपल्या संग्रहालयांना पूर्णपणे डिजिटल करण्याचं काम करताहेत. दिल्लीमध्ये आपल्या राष्ट्रीय संग्रहालयानं याविषयी काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय संग्रहालयाव्दारे जवळपास दहा ‘आभासी दीर्घा’ तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. आहे ना, ही एक आगळी मजेदार, रंजक गोष्ट! आता तुम्ही घरामध्ये बसून दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या दीर्घेतून एक फेरफटका मारून येऊ शकता

मान की बात मधील महत्तपूर्ण बाबी?

➤आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे. अलिकडेच, एका रंजक प्रकल्पाविषयी माहिती माझ्या वाचनात आली. नॉर्वेच्या उत्तरेकडे स्वालबर्ड नावाचे एक व्दीप आहे. या व्दीपामध्ये आर्कटिक वर्ल्‍ड आर्काईव्हचा प्रकल्प बनवण्यात आलाय. या आर्काईव्हमध्ये बहुमूल्य वारसाविषयक माहिती, अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आली आहे की, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटाचा त्या माहितीवर प्रभाव पडू नये. अलिकडेच अशीही माहिती समजली की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करून या प्रकल्पाचे जतन करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, त्यांचे उद्‌गार यांचाही समावेश असेल. मित्रांनो, महामारीने एकीकडे आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे, तर दुसरीकडे निसर्गाला नव्या ढंगानं अनुभवण्याची संधीही दिली आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला आहे. ऋतुचक्रातल्या हिवाळ्याला आता प्रारंभ होत आहे. निसर्गामध्ये वेग-वेगळ्या रंगांची उधळण आपल्याला पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून चेरी ब्लॉसमच्या व्हायरल फोटोंनी इंटरनेट व्यापून गेलं होतं. आता तुम्ही विचार करीत असणार की, मी चेरी ब्लॉसमविषयी बोलतोय, म्हणजे नक्कीच जपानची ओळख म्हणून असलेल्या चेरी ब्लॉसमची गोष्ट करतोय.- मात्र तसं काही नाहीए. हे काही जपानचे छायाचित्र नाही. हे छायाचित्र आपल्या मेघालयातल्या शिलाँगचे आहे. सध्याच्या दिवसात मेघालयाच्या सौंदर्यामध्ये या चेरी ब्लॉसमने अधिकच भर घातली आहे.



मान की बात मध्ये सलीम अली बद्दल सांगितल्या काही गोष्टी

➤मित्रांनो, या महिन्यात म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अली जी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे. संपूर्ण जगभरातल्या पक्षी निरीक्षकांना भारताकडे आकर्षितही केलं आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणा-यांचं मी नेहमी कौतुक करतो. ही मंडळी खूप धैर्याने, अगदी चिकाटीनं अनेक तास, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी निरीक्षण करू शकतात. निसर्गातल्या अगदी अनोख्या दृष्यांचा आनंद घेऊ शकतात. इतकंच नाही तर त्यांच्याकडचं ज्ञान, आपल्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवत राहतात. भारतामध्येही अनेक पक्षी निरीक्षण संघटना सक्रिय आहेत. तुम्हीही जरूर या विषयाशी जोडलं जावं. माझ्या इतक्या धावपळीच्या दैनंदिन व्यवहारातही मला अलिकडेच केवडियामध्ये पक्ष्यांबरोबर काही वेळ घालवता आला, ती एक संस्मरणीय संधी होती. पक्ष्यांबरोबर घालवलेला काळ, वेळ तुमचे निसर्गाशी नाते जोडले जाऊन, पर्यावरणासाठी एक प्रेरणा देईल.

गौरव शर्मा ना दिल्या शुभेच्छा


➤न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. एक भारतीय म्हणून भारतीय संस्कृतीचा असा होत असलेला प्रचार आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो. त्यांनी न्यूझीलँडच्या लोकांची सेवा करताना नवीन यशोशिखर गाठावे, अशी कामना व्यक्त करतो.

शेतकरी कायद्या बद्दल केला खुलासा

➤माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात, शेती आणि त्याच्याशी सबंधित गोष्टींशी नवे आयाम जोडले जात आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या न कोणत्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांना वचन दिलं होतं, त्या मागण्या आज पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावर असलेली बंधने केवळ रद्दच होणार नाहीत, तर त्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत. या अधिकारांमुळे अगदी अल्पावधीतच, शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांनी या नव्या कृषी कायदयाचा वापार कसा केला ते जाणून घेतले पाहिजे. त्यानी शेतात मका लावला आणि उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले. पिकाची एकूण किंमत 3 लाख 32 हजार इतकी निश्चित झाली. जितेंद्र भोई यांना पंचवीस हजार रुपये आगावू रक्कम म्हणून मिळाले. ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना पंधरा दिवसांत दिले जातील. मात्र नंतर अशी काही परीस्थिती निर्माण झाली, की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा मात्र महिनोन्महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीत,-मकाखरेदीत कदाचित वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे व्यवहार होत असतील, त्याच परंपरेने ते ही वागत होते. अशाप्रकारे चार महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत. अशा स्थितीत, केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले, ते त्यांच्या कामी आले. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे, की शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो. या कायद्यात आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे. या कायद्यात, अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या भागातल्या, उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करावं लागेल. आता, जेव्हा अशा कायद्यांची ताकद आपल्या शेतकरी बंधूंजवळ होती, तेव्हा त्यांच्या तक्रारीचं निवारण तर निश्चित होणार होतं. जितेंद्रजी यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले. म्हणजेच, कायद्याची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ जितेंद्रजी यांची ताकद झाली. क्षेत्र कुठलेही असो, त्या प्रत्येक क्षेत्रात, भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि खरी माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे ही खूप मोठी शक्ती असते. शेतकऱ्यांमध्ये अशीच जागृती करण्याचे काम, राजस्थान मधल्या बारां जिल्ह्यात राहणारे मोहम्मद असलम जी करत आहेत. ते शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. होय, आपण बरोबर ऐकलंत- शेतकरी उत्पादक संघटनेचे सी ई ओ ! मला आशा आहे, की मोठमोठ्या कंपन्यांच्या सी ईओ ना हे ऐकून चांगलं वाटलं असेल की देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांचे देखील सी ई ओ असतात. तर मित्रांनो, मोहम्मद असलम जी यांनी आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये ते दररोज, आसपासच्या बाजारमध्ये काय भाव सुरु आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. त्यांची स्वतःची संघटना देखील शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत असते. त्यामुळेच, त्यांच्या या उपक्रमामुळे, शेतकऱ्यांना मालविक्रीचा निर्णय घ्यायला मदत होते.